ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान

ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान

ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान

पूर्वप्रसिद्धी: साधना 28 फेब्रुवारी 2015

मुंबईच्या  राष्ट्रीय विज्ञान संमेलनात अनेक मंत्र्यांची भाषणे झाली. देशामध्ये विज्ञानाचा विकास व्हावा म्हणून सरकारची धोरणे काय असणार? या सारख्या विषयांचा उहापोह मंत्र्यांच्या भाषणात अपेक्षित असतो. पण बहुसंख्य  नेत्यांच्या भाषणात प्राचीन भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान किती प्रगत होते याचीच माहिती होती. समाजाला प्रगती करायची असेल तर आत्मविश्वास लागतो; आपल्या  पूर्वजांचे कर्तृत्व किती मोठे आहे या जाणीवेतून आत्मविश्वास बळावतो. पण मुख्यतः इतिहासाचा अभ्यास हा इतिहासापासून शिकण्यासाठी करायचा असतो. आपली प्रगती ज्या क्षेत्रात, जेंव्हा झाली तेंव्हा त्याची करणे काय होती? आपली प्रगती ज्या क्षेत्रात खुंटली, जेंव्हा खुंटली तेंव्हा त्याची करणे काय होती याचा शोध आणि त्या पासून बोध महत्वाचा असतो. मुंबईत भाषणे करण्याऱ्या नेत्यांनी असा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, मग बोध घेणे तर दूरच राहिले. पण म्हणून इतिहासाचा असा अभ्यास करण्याचे महत्व कमी होत नाही. वैज्ञानिक प्रगती करण्यासाठी अनुकूल सामजिक मानस तयार करायचे तर भारतातील विज्ञान आणि तंत्रविज्ञान यांचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. ती जवाबदारी सर्व सुजाण नागरिकांची आहे कारण हा एकूण समाज घडवण्याचा कार्यक्रम आहे.

 

 

 

 

उत्पादक श्रमपद्धती मधील, तंत्रज्ञानामधील भरारी

आपल्या पूर्वजांनी फार मोठी प्रगती केलेले पहिले क्षेत्र म्हणजे उत्पादक श्रमपद्धती आणि व्यावहारिक तंत्रज्ञान. भारतातल्या श्रमिकांनी फार मोठी ज्ञानसंपदा प्रत्यक्ष कार्यानुभावातून विकसित केली. शेती ,पशुपालन, वस्त्रनिर्मिती, वास्तुनिर्मिती, धातुनिर्मिती, औषधी वनस्पती या सारख्या क्षेत्रात हे योगदान फार मोठे आहे.

अनेक प्रकारची फळे, धान्ये आणि भाज्या; प्रत्येक प्रकारात अनेक जाती यांचे वैविध्य भारतातल्या शेतकऱ्यांनी युगानुयुगे जोपासले आहे. विविधतेने नटलेल्या भारतातील निसर्गाने त्यांना या कार्यात चांगलीच साथ दिली. जगातील फळाफुलांच्या  नव्या जाती भारतातल्या शेतकऱ्यांना जेंव्हा केंव्हा उपलब्ध झाल्या तेंव्हा त्यांनी त्या आपल्या जमिनीला आणि हवामानाला योग्य असल्या तर उत्साहाने स्वीकारल्या इतकेच नव्हे तर त्यांच्या मध्ये अधिक योग्य गुण  विकासित करण्याचे प्रयोगही त्यांनी यशस्वी केले. पशुधानाबद्दलही हे खरे आहे. जगातल्या सर्वात उत्तम दुध देणाऱ्या म्हशींच्या जाती  आणि शेती कामासाठी अत्यंत सक्षम अशा बैलांच्या जाती भारतातल्या पशुपालकांनी निर्माण केल्या. वस्त्र उत्पादनामधे आपल्या पूर्वजांची ख्याती जगभर पसरली होती. अत्यंत तलम सूती आणि रेशमी कापड भारतातून जगभर निर्यात होत होते. काळ्या पहाडात गुहा खोदून त्यात मूर्ती घडवताना चूक झाली तर ती सुधारायला अजिबात संधी नसते. नुसती हातात कला असून पुरत नाही. दिशा आणि प्रमाण यांचे कमालीचे भौमितिक ज्ञान आणि भान असावे लागते. पिढ्यान पिढ्या हे काम करून एक प्रकल्प पुरा करायचा तर अचूक नियोजन करता यावे लागते. आपल्या पूर्वजांच्या या क्षेत्रातील कर्तृत्वाची साक्ष देणारे अनेक गुफा शिल्प प्रकल्प भारतभर आहेत. कोणत्या वनस्पती मध्ये कोठले औषधी गुण आहेत याचे आपल्या पूर्वजांचे प्रचंड ज्ञान हे फक्त आयुर्वेदापुरतेच मर्यादित नाही; ते वैद्य, भगत, वैदू आणि आजीबाईच्या बटव्या पर्यंत सर्वदूर पसरलेले आहे. मेलेली गुरे कापणारे ढोर हे सस्तन प्राण्याच्या शरीरविज्ञानचे मूळ संशोधक. त्यानी मिळवलेले ज्ञान हा भारतीय शस्त्रक्रियाशास्त्राचा पाया होता. उत्पादक श्रमक्षेत्रात  भारतातल्या श्रमिकांनी जी मोठी ज्ञानसंपदा आणि तंत्राकौशाल्यची पातळी प्रत्यक्ष कार्यानुभावातून विकसित केली ती इतकी प्रभावी होती की पंधराव्या शतकापर्यंत भारत हा जगातील सर्वात संपन्न देश होता आणि भारतील दर डोई उत्पन्न हे युरोपच्या तुलनेत खूप जास्त होते.

दार्शनिक तत्वज्ञान, गणित , खगोलशास्त्र 

आपल्या पूर्वजांच्या यशाचे दुसरे महत्वाचे क्षेत्र म्हणजे दार्शनिक तत्वज्ञान. युरोप आणि मध्यपूर्वेत एक देव, एक प्रेषित, एक धर्मग्रंथ आणि धर्मग्रंथात सांगितलेले उपदेश या मध्ये ज्यू , क्रिस्ती आणि मुसलमान यांचे दार्शनिक तत्वज्ञान सीमित झाले. भारतात तसे झाले नाही. वेदांपासून ते शंकराचार्यांपर्यंत भारतात अनेक दार्शनिक तत्वज्ञाने तीनही अंगात भारतीयांनी बरीच प्रगती केली होती. प्राचीन भारतातील खगोलतज्ञ हे उत्तम गणितीही होते. त्यांनी सूर्य, चंद्र, तारे आणि ग्रह यांची बदलती स्थाने काळजीपूर्वक मोजून अनेक सिद्धांत मांडले. भारतीय खागोलाताज्ञांची ख्याती दूरवर पसरली होती. खगोलशास्त्रविषयक अनेक भारतीय पुस्तकांची भाषांतरे त्या काळात अरबी आणि चीनी भाषांमध्ये करण्यात आली. या क्षेत्रातील आपल्या पूर्वजांची कामगिरी दाखवणारी एक लाखाहून जास्त हस्तलिखिते आजघडीलासुद्धा उपलब्ध आहेत.

विज्ञान आणि तंत्रविज्ञान कशाला म्हणायचे

आज विज्ञान आणि तंत्रविज्ञान याना सर्वसामान्यांमध्ये खूप प्रतिष्ठा आहे कारण त्यांचे फायदे रोजच्या जीवनात अनुभवास येत आहेत. त्यामुळे प्रत्येकच ज्ञान (आणि ‘न’ज्ञान) हे विज्ञान आहे असे सांगितले जाते. मोटारगाडी रस्त्याच्या डाव्याबाजुने चालवावी हे उपयुक्त आणि सत्यज्ञान आहे, पण ते विज्ञान नाही. विज्ञान कशाला म्हणायचे? वैज्ञानिक पद्धती काय असते ? या प्रश्नांची खूप सखोल चर्चा गेल्या शंभर वर्षात झाली आहे. (विज्ञानातील  इतर प्रश्नांप्रमाणेच याही प्रश्नांची उत्तरे सतत सुधारत आहेत). या अभ्यासातून विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती बाबत पुढील किमान आवश्यक निकष आता सर्वमान्य आहेत: १) विज्ञानात या जगातील इंद्रियजन्य अनुभव सत्य आणि प्रमाण मानले पाहिजेत. २) अनुभवास येऊ शकेल असे अनपेक्षित भाकीत वैज्ञानिक सिद्धांताच्या सहाय्याने करता आले पाहिजे. ३) आज खरे वाटणारे वैज्ञानिक नियम भविष्यात चूक ठरण्याची शक्यता वैज्ञानिकांनी मान्य केली पाहिजे ४) वैज्ञानिक नियम पडताळून पाहण्याची, ते खोटे ठरवण्याची नेमकी, शक्य आणि वैज्ञानिकसमूहाला मान्य पद्धती उपलब्ध असली पाहिजे. उदाहरण म्हणून न्युटन च्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताकडे बघू. गुरुत्वाकर्षणाची गणिते अचूक ठरण्यासाठी अंतराळात विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट आकाराचा आत्तापर्यंत महित नसलेला ग्रह असला पाहिजे असे अनपेक्षित भाकीत करण्यात आले. अधिक शक्तिशाली दुर्बिणी जेंव्हा त्या ठिकाणी रोखण्यात आल्या तेंव्हा तिथे हा डोळ्यांना न दिसणारा ग्रह सापडला. (त्याला नेपच्यून नाव दिले गेले). वस्तुमान हे अपरिवर्तनीय असते, ते नेहमीच कायम राहते हा आधीचा वैज्ञानिक नियम आइनस्टीनने चूक ठरवला. वस्तुमानाचे उर्जेत रुपांतर होऊ शकेल हे त्याचे अनपेक्षित भाकीत अणुबॉम्बच्या रुपाने वस्तविक अनुभवास आले.

विज्ञान कशाल म्हण्याचे? वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय? यांचे वर सांगितलेले सर्वमान्य निकष मान्य केले तर एक सरळ सोपा निष्कर्ष निघतो तो असा की प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात विज्ञान जन्माला सुद्धा आले नाही.

तंत्रज्ञान आणि तंत्रविज्ञान यातील फरक

तांत्रिक कौशल्य, तंत्रज्ञान आणि तंत्रविज्ञान यातील फरक लक्षात घेणेही महत्वाचे आहे.  जेव्हा विज्ञानाच्या आधारवर तंत्रज्ञान विकसित होते, केले जाते, तेव्हा ते तंत्रविज्ञान बनते. इंग्रजीत तंत्रज्ञानाला टेकनीक (technique)  आणि तंत्रविज्ञानाला टेक्नोलोजी   (technology) असे शब्द आहेत. झेंडे दाखावून दूरवर संदेश पोचवणे हे तांत्रिक कौशल्य आहे आणि विज्ञानाने निर्माण केलेले रेडियो लहरींचे ज्ञान वापरून संदेश वाहनाची रेडियो सारखी यंत्रे बनवणे हे तंत्रविज्ञान आहे. नाडीपरीक्षा हे तंत्रज्ञान आहे, एक्स-रे हे तंत्रविज्ञान आहे. बैलगाडी हे तंत्रज्ञान आहे, विमान हे तंत्रविज्ञान आहे. तंत्रज्ञानावर विज्ञानाचे आरोपण झाले की तंत्रविज्ञान निर्माण होते. प्राचीन आणि मध्युयुगीन भारतात तंत्रज्ञान होते पण विज्ञानच नसल्यामुळे तंत्रविज्ञानही नव्हते.

विज्ञानामुळे तंत्रज्ञानात फार वेगाने फार मोठी सुधारणा घडून येते. विज्ञान आणि तंत्रविज्ञान टप्प्याटप्प्याने, क्रमाक्रमाने विकसित होते. विस्तव पेटवण्यासाठी वेगवेगळी तंत्रज्ञाने आणि तंत्रविज्ञाने क्रमाक्रमाने विकसित झाली : १. निसर्गाने निर्माण केलेला विस्तव सांभाळून ठेवणे, २. गारगोटीवर गारगोटी घासणे, ३. लाकडात लाकडाची रवी घुसळणे, ४. काड्यापेटी, ५. ग्यास लायटर ,  ६. इलेक्ट्रॉनिक लायटर, इत्यादी . विस्तव पेटवण्याच्या या सहा पद्धती पैकी पहिल्या तीन पद्धती तंत्रज्ञान आहेत, शेवटच्या तीन पद्धती या तंत्रविज्ञान आहेत. सुरवातीची तीन तंत्रज्ञाने विकसित होण्यासाठी लाखो वर्षे लागली. नंतरची तीन प्रभावी आणि सोयीची तंत्रविज्ञाने विकसित होण्यासाठी विज्ञानाच्या उदयानंतर ३००हुन कमी वर्षे लागली. नवी तंत्रवैज्ञानिक पद्धती विकसित झाली की आधीची तंत्रज्ञानिक पद्धती मागे पडते हेही या उदाहरणावरून स्पष्ट होते.

तंत्रवैज्ञानिक पद्धतींच्या विकासाचा एक क्रम, एक उतरंड असते. मोटारगाडीचा शोध लागण्या आगोदर चाके, लोह, गिअर, इंजिन इत्यादी अनेक तंत्रज्ञाने आणि तंत्रविज्ञाने विकसित झालेली असणे आवश्यक होते . जेंव्हा सायकल बनत नाही तेंव्हा मोटारगाडी कशी बनेल? ज्या समाजात इंधन जाळून पाणी उपसणारा पंप बनत नाही त्या समाजात इंधन वापरून उडणारे विमान कसे बनू शकेल? आज भूतकाळात आणि भविष्यकाळात संचार करू शकणारी यंत्रे (Time Travel Machines) अनेक कथात आणि सिनेमात असतात. त्यातून कादंबरी लिहिणाऱ्यांची कल्पनाशक्ती दिसते. हजार वर्षांनी आजच्या या कथा, सिनेमे पाहून जर आपल्या वंशजांनी असा निष्कर्ष काढला की २०१४ साली असे भूतकाळात आणि भविष्यकाळात संचार करू शकणारे यंत्र आमच्या पूर्वजांनी बनवले होते, तर ते कसे होईल? स्वर्गात आपले उर अभिमाने भरून येईल का?

प्राचीन भारतात विज्ञानाचा उदय का झाला नाही?

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात विज्ञान जन्माला आले नाही या बद्दल आपल्यला फार खेद आणि कमीपणा वाटण्याची गरज नाही, युरोपमध्येसुद्धा विज्ञान आणि तंत्रविज्ञान यांचा जन्म जेमतेम ५०० वर्षेच जुना आहे, आणि मानवी समाजाचा इतिहास लाखो वर्षांचा आहे.

प्रश्न आहे तो हा की प्राचीन भारतात एवढी संपन्नता, एवढे वैविध्य, एवढी बौद्धिक भरारी असताना विज्ञानाचा उदय का झाला नाही? युरोप मध्ये १५०० वर्षे, तमोयुगात, पूर्वजांच्या ज्ञानवारशाशी तेथील लोकांचा सबंध तुटला होता, युरोप मधे विज्ञानाचा जन्म होण्या अगोदर ‘बौद्धिक पुनरु:थान’ (renaissance) होणे आवश्यक होते. भारतात असे घडले नाही, त्याची आवश्यकताही नव्हती. पूर्वजांच्या ज्ञानवारशाशी आपला सातत्याचा आणि जिवंत संबंध होता. आणि तरीही भारतात विज्ञानाचा उदय का झाला नाही?  या प्रश्नातील वास्तविकता मान्य करून आपण जितके नेमके उत्तर शोधू तितके वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक प्रगतीला योग्य सामाजिक मानस आजच्या भारतात तयार होईल.

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात विज्ञान जन्मले नाही याची दोन मुख्य करणे आहेत, ती म्हणजे १) अद्वैत तत्वज्ञानाचा मोठा आणि निर्णायक विजय आणि ज्ञानसाधानेचा ब्रह्मज्ञान हाच उद्देश याचा स्वीकार २) ‘ज्ञानसाधना’ आणि ‘श्रमिक जाती ’ यांची पूर्ण फारकत करणारी जातीधीष्टित समाजव्यवस्था.

शंकराचार्यानी ज्या अद्वैत वाद्चे समर्थन करून त्याची विजयी स्थापना केली त्याचा  सध्याच्या विषयाच्या संदर्भात थोडक्यात गोषवारा पुढील प्रमाणे, ‘आत्म आणि ब्रम्ह हे एकच आहेत. सर्व विश्व एकच ब्रम्हरूप आहे. दिसणारे वैविध्य ही माया आहे. ब्राह्मणांनी जी ज्ञानसाधना करायची तिचा उद्देश ब्रह्माचे साक्षात्कारी ज्ञान होणे हा आणि हाच असला पाहिजे. कर्मकांड आणि तपस्या या साधनातून ‘याची देही, याची डोळा’ आत्म आणि ब्रह्म यामधील द्वैत लयाला जाऊ शकते. लक्षावधी योनिंतून प्रवास करून ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यामुळे ही मोक्ष प्राप्तीची संधी प्राप्त झाले आहे. तिचा फायदा करून घेऊन ब्रह्म अनुभवले पाहिजे. जिवनातील इंद्रियजन्य सुखांच्या पूर्ती साठी, त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी श्रम वाया घालवता कामा नयेत. ब्रम्हाचे दर्शन – ज्ञान झाल्यावर प्राप्त होणारा ब्रम्हानंद हेच परम सुख आहे. तर्काने ब्रम्हाचे आकलन शक्य नाही, त्या साठी कर्मकांड आणि तपस्या हेच मार्ग आहेत. द्वैताचा स्वीकार म्हणजे अविद्येचा स्वीकार करून ब्रम्हज्ञान नाकारणे आहे.’

विज्ञानाचा पाया आणि कार्यक्रम शंकराचार्यांनी सांगितलेल्या जीवनदृष्टीशी, ज्ञानसाधनेच्या पद्धतीशी विसंगत आहे. विज्ञान इंद्रियजन्य अनुभव प्रमाण मानते. या ‘मायावी’ जगातले द्वैत खरे मानून त्यातल्या संबंधाचे नियम शोधणे हे विज्ञानाचे कार्यक्षेत्र आहे. हे द्वैत स्थान आणि वेळ या मधले आहे, वस्तुमान आणि उर्जा या मधील आहे, सजीव आणि निर्जीव या मधील आहे, इत्यादी, इत्यादी. द्वैताचा शोध आणि वर्गीकरण जिथे संपते तिथे विज्ञानप्रदेश संपतो. विज्ञानसाधना ही शंकरमताप्रमाणे अविद्या आहे. योग्यमार्गानी उपसना करून मोक्ष प्राप्तीची दुर्मिळ संधी ज्यांना मिळाली आहे ते हे चुकीचे, अविद्येचे, विज्ञानाचे मार्ग का बरे चोखाळतील?

तंत्रज्ञानाचा विकास निव्वळ कार्यानुभवातून एका मर्यादे पर्यंतच होऊ शकतो. समुद्रात दूरवर जाणाऱ्या बोटींना ग्रह तारे बघून आपले स्थान सोपेपणे ठरवता यावे म्हणून कोपर्निकसला सूर्यकेंद्री रचनेचा नवा विचार मांडावासा वाटला. तंत्रज्ञानावर विज्ञानाचे आरोपण केले की तंत्राविज्ञानाचा जन्म होतो.  या तंत्राविज्ञानाचे क्रांतिकारी फायदे समाजाला मिळाले की वैज्ञानिक संशोधनाला पाठबळ मिळते. भारतीय समाजात श्रम करणाऱ्या जातींना कोठलेही अधिक व्यापक, सैद्धांतिक ज्ञान मिळवण्याचा अधिकार नाकारला गेला. त्यांनी निर्माण केलेले तंत्रज्ञान कुंठित झाले, ते तंत्रविज्ञान बनू शकले नाही. व्यापक ज्ञानाचे कुरण ज्यांच्या साठी  राखीव करण्यात आले त्यांनी श्रमजीवीज्ञान, तंत्रज्ञान यांची साधना दुर्लक्षित केली एवढेच नाही तर अशी ज्ञानसाधना चुकीची मानली आणि निव्वळ कर्मकांड आणि तपस्या हाच मार्ग स्वीकारला.

अद्वैतावर आधारलेली जीवनाची पद्धती आणि श्रेयकल्पना सगळ्याच समाजात पसरली, मान्यताप्राप्त झाली. “ठेविले अनंते तैसेची राहावे” ते “आजी म्या ब्रम्ह पहिले” असे अनेक रुपानी ते सर्वांच्या संस्कृतीत रुजले. ‘सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्या मध्ये ब्रह्मानंद” अशी अद्वैती परंपरेशी नाते संगणारी काव्यपंक्ती विंदा कारांदिकरांसारख्या भौतिकवादी मार्क्सवादी कवीला सुद्धा, सामाजिक जाणिवेचे महत्व सांगताना, लिहीविशी वाटते ते त्यामुळेच.

इसवीसनाच्या आठव्या शतकानंतर भारतात अद्वैत मताचे, तत्वज्ञानाचे, जीवनदृष्टीचे प्राबल्य झाले. इसवीसनाच्या आठव्या शतकानंतर सांख्य, चार्वाक या सारखे वैज्ञानिक पद्धतीशी कमी विसंगत विचार मागे पडले, बुद्ध धर्म भारातून जवळपास हद्दपार झाला, तंत्रज्ञानाचा विकास थंडावला आणि विज्ञान जन्मलेच नाही हा काही काक-तालीय अपघात नाही.

तंत्रज्ञानाचा विकास आणि जातीव्यवस्था

मध्ययुगीन भारतात विज्ञानाचा जन्मच झाला नाही त्यामुळे विज्ञानावर आधारलेले तंत्रविज्ञान निर्माण झाले नाही हे खरेच. पण जातीव्यवस्था आणि निव्वळ तंत्रज्ञानाचा विकास (तंत्राविज्ञानाचा नव्हे) यांचा संबंध काय आहे? जाती असलेल्या मध्ययुगीन भारतात तंत्रज्ञानाचा चांगला विकास झाला हे आपण या लेखाच्या सुरवातीला पाहिले. जातीव्यवस्थेत व्यावसाईक एकाग्रता (specialization) जोपासली जाते. कारागीर एकच काम आयुष्यभर करतो, पिढ्यान पिढ्या करतो. त्याला उपजीविकेचे दुसरे साधन नसते, वापरायला बंदी असते. व्यावसाईक एकाग्रता ही तंत्रज्ञानाच्या विकासाला नक्कीच पोषक असते . भारतात तंत्रज्ञानाचा चांगला विकास झाला या मागे हे एक महत्वाचे कारण आहे.

पण या मध्युगातच तंत्रज्ञानाचा विकास हळू हळू कुंठीत झाला का? वस्त्रउद्योग, चर्मउद्योग या जीवनावश्यक क्षेत्रांचा जो तोटका इतिहास उपलब्ध आहे त्यावरून असे झाले असावे असे जाणवते. मध्ययुगातच भारतात उत्पादक तंत्रज्ञानाचा विकास मंदावला याची तीन तर्कसुसंगत कारणे लक्षात येतात, ती पुढील प्रमाणे:

  1. श्रमिकाना लिहिता वाचता येणे, तंत्रज्ञानाची लिखित माहिती उपलब्ध असणे, विशिष्ट ज्ञानाची अधिक व्यापक ज्ञानाशी नाळ जोडली जाणे हे तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आवश्यक असते. जातीव्यवस्थेमधे श्रमिकांना व्यापक ज्ञान नाकारले गेले इतकेच नाही तर दालित जातींना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले.
  2. प्रत्येक जातीचा एक स्वतः बद्दलचा दुराभिमान जातीव्यवस्थेत जोपासला जातो. ‘आमच्यात असे नाही’ या म्हणण्या मागे आमचे ते चांगले आहे, तुमचे आम्ही स्वीकारणार नाही असा बाणा आणि व्यवहार असतो. सगळेच समाज ‘आमचे आणि त्यांचे’ असा भेद करतात हे खरे पण जातीव्यवस्थेत या भेदाची परिसीमा पहावयास मिळते; ती जीवनाच्या सर्व अंगांना पुर्णतः व्यापून टाकते. रोटी-बेटी बंदी मधून या व्यवहाराला भौतिक पाठबळ मिळते. सारस्वत आणि सिकेपी या दक्षिण कोकणातल्या दोन लहान शेजारी राहणाऱ्या जाती. दोन्ही जाती मांसाहारी, मासे खायला आवडणाऱ्या. आपल्या पाककला तंत्रज्ञाना बद्दल दोघानाही अभिमान. पण या जीवनावश्यक आणि आनंददायी तंत्रज्ञानात परस्पराकडून काही स्वीकारायला त्यांचा ठाम नकार आहे. पदार्थाला आंबटपणा यावा म्हणून सारस्वत आमसूल वापरणार, चिंच वापरणार नाहीत; पदार्थाला आंबटपणा यावा म्हणून सिकेपी चिंच वापरणार, आमसूल वापरणार नाहीत ! तंत्रज्ञानाचा विकास देवाण-घेवाणीतून होतो. जातीव्यवस्थेमुळे अशी देवाण-घेवाण कठीण बनते.
  3. उत्पादक काम करणाऱ्या श्रमिकांचे गट जितके लहान, एकमेकांपासून जितके विभक्त तितके त्यांच्यामाधील ज्ञान आणि कौशल्य यांची देवाणघेवाण कमी. कापूस पिकवणारे शेतकरी वेगळे, कापूस पिंजाणारे पिंजारी वेगळे, सुत कातणाऱ्या जाती वेगळ्या, विणकर वेगळे, कोष्टी वेगळे, काष्टींमध्ये देवाची वस्त्र विणणारे देवांग कोष्टी वेगळे, कापड रंगवणारे वेगळे; या कोणामध्येही रोटी-बेटी व्यवहार तर पूर्णतः अशक्य. या सर्वांमध्ये फक्त तंत्रज्ञानविषयक माहितीची, कौशल्यांची देवाण-घेवाण कठीण गेले तर त्यात नवल ते काय?

थोडक्यात तंत्रज्ञान विकासाच्या संदर्भात जातीव्यवस्थेचा परिणाम दोन परस्पर विरोधी प्रकारचा आहे. सुरवातीला जातीव्यवस्थेतील  व्यावसाईक एकाग्रतेमुळे (स्पेशलायझेशन मुळे)  विकासाला चालना मिळते. पण कालांतराने जातिव्यवस्थेतील: १. श्रमिक जातींवर ज्ञानसाधानेला बंदी २. जाती-पोटजातीतील अभिमान आणि   ३. जाती जाती मधील अभिसरण फार मर्यादित असणे  या मुळे  तंत्रज्ञानाच्या  विकासाला खीळ बसते.

हे प्रत्यक्षात कसे घडले याचा मध्ययुगातील तपशीलवार इतिहास उपलब्ध नाही पण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकात सुद्धा हे घडतच राहिले. चर्मोद्योग आणि सार्वजनिक स्वच्छता ही दोन श्रमिक काम करत असलेली मोठी क्षेत्रे आहेत. वानगीदाखल या क्षेत्रात जातीव्यवस्थेमुळे तंत्रज्ञानाचा विकास कसा कुंठित झाला हे समजून घेणे उद्बोधक आहे.

चर्म उद्योग विकास आणि जातीव्यवस्था

तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश या दोन प्रदेशात चर्मोद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. तामिळनाडू मधे हा उद्योग आंध्रमधून तेराव्या शतकात आलेल्या मादिगा जातीच्या  श्रमिकांनी सुरु केला. झाडाच्या खोडान्मधून  मिळालेली रसायने वापरून कातडी कमावण्याचे तंत्रज्ञान तामिळनाडूमधे खूपच प्रगत अवस्थेत पोचले होते. त्यांनी तयार केलेली चामडी उच्च दर्जाची असते असे मत इंग्रजी अभ्यासकानी नोंदवले आहे. पण त्याच बरोबर हे कातडी कमावणारे लोक नवे तंत्रज्ञान (मुख्यतः क्रोमियमचा वापर करण्याचे?) स्वीकारत नाहीत अशी तक्रारही त्यानी नोंदवली आहे.

तामिळनाडूच्या तुलनेत कातडी कमावण्याचे तंत्र उत्तरप्रदेशमधे कमी विकसीत होते. उत्तरेत शहरातील चर्मकारांचे वेगळे मोहल्ले शहरातील कसब्या मधे असत (आजही ते आहेत). तेथे हे काम चमार जातीचे श्रमिक करत (करतात). १८२० साली जोन क्रीफोर्द  या गोऱ्या साहेबाने बरेलीतील कसब्यात  ७१ जातीनिहाय व्यवसाय चालू असल्याची नोंद केली आहे; त्या मधे चामड्याचे  व्यवसाय करणाऱ्या चमार आणि मोची मधील १५ व्यवसायांची (पोटजातींची?) नोंद आहे. (जोडे करणारे, बाटल्या बनवणारे, खोगीर बनवणारे, लगाम बनवणारे, इत्यादी ). त्यांना मदत करू पाहणाऱ्या स्तुवर्त नावाच्या गोऱ्या साहेबाबद्दल चमाराना  फार प्रेम होते. ते त्याल ‘बडा मोची’ म्हणत. त्यांच्या भगवात्दास देवळाबाहेर चमारानी  स्तुवर्त  साहेबाचा पुतळा उभारला. पण गावोगाव पसरलेल्या चमारानी कातडी कमाविण्याचे नवे तंत्र आत्मसात केले नाही. ‘हे चमार चांगल्या कातडीचे वाईट चामडे बनवतात’ असे १९१८ साली नेमलेल्या शोध समितीने म्हटले आहे. शहरात येणाऱ्या नव्या कातडी कमावण्याच्या कारखान्यांच्या स्पर्धेत गावोगाविचे चमार टिकणार नाहीत, त्यांच्या साठी काय करावे? या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी १९०७ साली उत्तरप्रदेश सरकारने च्याटर्जी यांची नेमणूक केली. च्याटर्जीनी चमाराना नवी तंत्रे शिकवण्यासाठी दोन प्रकारच्या शाळा सुरु करण्याची सूचना केली: पहिली शाळा कातडी कमावण्याचे प्रशिक्षण देणारी आणि दुसरी शाळा चामड्याच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देणारी. चमार हे बाहेरचे काही स्वीकारत नाहीत तेंव्हा त्यांच्यातील प्रमुख व्यक्तींचे या साठी साहाय्य घ्यावे असेही च्याटर्जीनी सुचवले. उत्तरप्रदेश सरकारने ही सूचना स्वीकारली. बाबू खेमचंद या चमार नेत्याचे साहाय्य घेऊन १९०८ साली पहिली शाळा सुरु केली . या शाळेत फक्त चमारांच्याच मुलांना प्रवेश होता ! म्हणजे बंगाली ब्राह्मण विचारवंत, चमार नेते आणि इंग्रज राज्यकर्ते यांनी एकत्र येऊन  चार्मोद्योगाचे शिक्षण फक्त चमारां साठी आणि चमाराना  फक्त चार्मोद्योगाचे शिक्षण असे धोरण राबवले. हे धोरण इंग्रजांच्या ‘तोडा’ राजनितीशी जसे सुसंगत होते तसेच जातीव्यवस्थेशीही सुसंगत होते. (पुढे बाबाब्साहेब आंबेडकरांचे महत्व कमी करण्यासाठी (?) इंग्रज सरकारने बाबू खेमचंद यांना गोलमेज परिषदेसाठीही बोलावले).

 

मैला सफाई तंत्रज्ञान आणि जातीव्यवस्था

मैला सफाईचे तंत्रज्ञान कसे विकसित झाले आणि कसे विकसित झाले नाही य बाबत अहमदाबाद शहराचा गेल्या दीडशे वर्षांचा इतिहास फार बोलका आहे. अहमदाबाद शहरात घरोघरीच्या शौचालयातून मैला गोळा करून तो वाहून नेण्याचे काम भंगी जातीतील श्रमिक एकोणीसव्या शतकात करीत असत. हे काम कमालीचे घाण म्हणून स्पृश्य समाज ते अजिबात करीत नसे. रनछडलाल चोत्तालाल हे अहमदाबादचे पहिले नगराध्यक्ष एक यशस्वी मिल-मालक होते. इंग्रजांच्या CIVIC SENSE ने ते भारावलेले होते. अहमदाबादमधील जास्त मृत्युदाराचे प्रमुख कारण अहमदाबादमध्ये जमिनीखालची भुयारी गटारे नाहीत असे इंग्रज सैन्याच्या एका अहवालात त्यांच्या वाचनात आले. रनचोडलालनी अहमदाबाद मधे भुयारी गटारे बांधण्याचे मनावर घेतले. १८८६ साली त्यानी याची एक योजना मांडली. त्या साठी त्या अगोदर पाचच वर्षे कर्नल वाल्तर दुकॅत यांनी बनवलेला अभियांत्रिकी आराखडा त्यांना उपयोगी पडला. अहमदाबाद मधे भुयारी गटारे बांधण्याच्या या योजनेला तीन प्रकारचा विरोध झाला. १. अहमदाबादमधील नागरिक मागासलेले आहेत त्यांना हे तंत्रज्ञान झेपणार नाही असे इंग्रज अधिकाऱ्यांचे मत होते; २. आपला रोजगार बुडेल, आपल्याला दुसरा रोजगार मिळणार नाही या भीतीतून भंग्यांचा विरोध होता; ३. पण सर्वात महत्वाचे कारण हे उच्च जातीयांचा विरोध हे होते. मैला भंग्यानी वाहून नेणे बंद झाले तर भंगी दुसरी कामे करू लागतील, त्यातून जातींची उतरंड कोलमडेल ही भीती त्या मागे होती. शिवाय सर्वांचेच संडास सामायिक गटाराल जोडले जाणार यातून होणारी ‘संगत’ त्यांतील शुध्द अतिउच्चाना मान्य नव्हती.  (पूर्वी याच कारणाने त्यांनी अहमदाबाद मधे नळातून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला विरोध केला होता !). हा विरोध कृतिशील होता. त्यांना ‘मागास’ म्हणणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या अहवालाचा त्यांनी प्रचारासाठी वापर करण्यास मागे-पुढे पहिले नाही मग त्या आहावालातील मुख्य मुद्दा अहमदाबादमिधील हे नागरिक मागासलेले आहेत ह्याहीकडे त्यांनी कानाडोळा केला. त्या अहवालाच्या प्रती गावभर वाटण्यात आल्या. विरोधकांनी रोजच्या रोज सभा घेतल्या.  उच्च जातीयांचा हा विरोध आक्रमकही होता. जाहीर सभेत आपली बाजू मांडण्यासाठी गेलेल्या चोत्तालालांवर या उच्च जातीयानी दगड मारले आणि शेण टाकले. तरीही चोत्तालालांनी आपला आग्रह सोडला नाही. अहमदाबाद मधले पहिले भुयारी गटार खादिया भागात १८९३ साली कार्यान्वित झाले.

भुयारी गटार फार सोयीचे आहे हे जनतेला अनुभवातून पटले. लोकांच्या मागणीमुळे १८९७ साली अहमदाबादच्य मध्यवस्तीत भुयारी गटारे करण्यात आली. भंग्यांचे काय करायचे? हा प्रश्नही सोडवण्यात आला. शहरातील वाढता घनकचरा निवडण्याचे, वाहण्याचे आणि गटारे साफ करण्याचे काम अहमदाबाद  नागरपालीकेने भंग्यांना आणि फक्त भंग्यांनाच देण्याचे ठरवले.  मग जुन्या शहराच्या ताटबंदीच्या आतील सर्व भागात १९३० पर्यंत भुयारी गटारे बांधण्यात आली.

दारूबंदीच्या काळात बेकायदा दारू साठवण्यासाठी भुयारी गटारांचा वापर सुरु झाला . त्याच बरोबर ओला आणि सुका घनकचरा वेगळा न करणे आणि घनकचरा भुयारी गटारांत टाकणे हे चालूच राहिले. ‘अहमदाबादमिधील नागरिक भुयारी गटारांसाठी लायक नाहीत’ हे इंग्रज अधिकाऱ्यांचे म्हणणे जणू काही अहमदाबादमिधील नागरिक  सिद्ध करत होते! त्यामुळे गटारे वरांवर तुंबू लागली, कचऱ्याची विल्हेवाट अधिक कठीण झाली. भांग्यांचे काम वाढले, रोजगार टिकून राहिला. भुयारी गटारानी जाती व्यवस्था धोक्यात आली नाही तर जाती टिकवून ठेवण्याचे एक नवे सार्वजनिक हत्यार उपलब्ध झाले.

पुढे काय झाले या विषयी या विषयावर एका अलीकडच्या अभ्यासक स्टेफनी टोम यांचे लिखाण उधृत करणे मला योग्य वाटते. त्या लिहितात, “परंपरेनुसार भंग्याना कोठलेही शिक्षण – प्रशिक्षण दिले जात नाही, गु-घाण साफ करण्या साठी त्यांना कोणतीही अवजारे दिली जात नाहीत. मिळेल ते लाकूड आणि पत्रे घेऊन ते गु-घाण खरवडतात, ती बादल्यांमध्ये भरतात आणि तिची वाहतूक करतात. भंगी अत्यंत प्राथमिक अवजारे वापरतात याचा वापर भंगी अडाणीच नव्हे तर मतिमंद असतात अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यात झाला. भंग्याना त्यंचे काम तिरस्करणीय वाटत नाही तर त्यांना आधुनिक अवजारे पुरवून त्यांचा वापर करण्याचे प्रशिक्षण कशासाठी द्यावयाचे? अशी सोईस्कर मनोभूमिका बनली. त्वचेतून आणि इतर वाटांनी विषारी पदार्थांनी त्यांच्या शरीरात प्रवेश करू नये म्हणून त्याना संरक्षक वेश देण्यात आले नाहीत कारण ते ज्या विषारी पदार्थांच्या सातत्याच्या सानिध्यात असतात ते त्यांच्या शरीरात भिनलेले आहेत आणि त्यांना नव्याने अपाय करू शकणार नाहीत असाही समज रूढ आहे, आणि तो भंग्यामधेही आहे. भंग्याना सुधारित अवजारे देणे याचा अर्थ भंग्याना बुद्धी आहे, भावना आहेत, त्यांना घाणीचा त्रास होतो हे मान्य करणे असा होणार! त्यामुळे अहमदाबादमध्ये मैलासफाईचे तंत्रज्ञान विषम पद्धतीने विकसित झाले.  एकाबाजुला  भुयारी गटारे, मैला परिवर्तीत करणारी संयंत्रे आणि पम्पिंग स्थानके मोठ्या प्रमाणावर विकसित झाली, त्यात सातत्याने नवी तंत्रज्ञाने वापरात आणली गेली तर दुसऱ्याबाजूला गटार सफाई आणि कचरा वेगळा करण्याच्या अवजारांमध्ये काहीही अवजारांमध्ये प्रगती झाली नाही. १९२४ ते २८ चा दरम्यान शहराध्यक्ष वल्लभभाई यांनी शहरातील मैला परिवर्तीत करणारी संयंत्रे आणि पम्पिंग स्थानके यांच्या सुधारणांसाठी मोठा निधी निश्चित केला. १९८५ ते १९९५ च्या काळात जागतिक बँकेच्या सहाय्याने शहराबाहेरील भागात भुयारी गटारे बांधण्यासाठी मोठे निधी उपलब्ध झाले. २००९ साली पम्पिंग स्थानके सुधारण्यात आली; त्यामध्ये आठ मार्गी तापमानमापक, अल्ट्रासोनिक त्रास्मिटर, इलेक्ट्रोमाग्नेटीक फ्लो मीटर, इत्यादी वापरण्यात आले. त्या योगे हे पंप आता दुरूनच पूर्णतः नियंत्रित करता येतात.  पण गटाराची सफाई आणि कचऱ्याची विभागणी या साठीची अवजारे अजूनही बादली आणि फावडे हीच आहेत.”

 

निष्कर्ष:

आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व मोठे होतेच, ते आपल्याला स्फूर्तिदायक आहे. पण त्याच बरोबर जातीवर आधारित जन्मसिद्ध विषमता, ज्ञानसंपादनाचे ब्राम्हणांचे राखीव अधिकार, अद्वैताच्या स्वीकारातून उपयुक्त ज्ञानसाधानेला विरोध , जाती–पोटजातींचे अनुवांशिक व्यवसाय, आणि जाती–पोटजातींचा अनाठायी गर्व हे आपण नाकारलेच पाहिजे. प्रत्यक्ष जीवन ही माया मानून भौतिक प्रश्नाची सोडवणूक न करता निव्वळ ब्रह्मज्ञान हेच खरे ज्ञान हे अद्वैती तत्वज्ञान आपण नाकारायला हवे. विज्ञान आणि  तंत्रज्ञांचा  मार्ग स्वीकारून आपण जीवनातल्या वास्तविक प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. ज्ञानसाधनेचा, संशोधनाचा अधिकार हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार म्हणून मान्य करून जोपासला पाहिजे. बाबा आढावानी आव्हान केल्या प्रमाणे ‘प्रत्येकाने सत्यशोधक’ बनण्याची गरज आहे.

 

ताजा कलम: गटारांची सफाई आणि कचऱ्याचे वर्गीकरण या बद्दलच्या वापरात असलेल्या व्तंत्रज्ञानाची आधी वर्णिलेली परिस्थिती अहमदाबाद पुरती मर्यादित नाही. याला पुष्टी देणाऱ्या दोन बातम्या हा लेख लिहून संपत आला त्यवेळी मला पुण्याच्या वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या: “सफाई करायला भुयारी गटारात आत उतरलेल्या कंत्राटी कामगाराचा गुदमरून मृत्यु” (सकाळ, पुणे,  २८ जानेवारी २०१५) आणि “कचरा वेगळा करताना विषारी वायुने महानगरपालिकेच्या कामगाराचे डोळे गेले’ (लोकसत्ता, पुणे , २९ जानेवारी २०१५). तेंव्हा लेखातील मांडणीला अधिक पुष्टी मिळण्या अगोदर लेख लिहायचे थांबवलेले बरे असा विचार करून हा लेख लिहायचे मी थांबवले.

 

लेखक – आनंद करंदीकर

E mail: anandkarandikar49@gmail.com

 

आमचे इतर विचारवेचे

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *