विचारवेध संमेलन २०१९

vicharvedh-conferences

 

विचारवेध संमेलन २०१९

विषय: रोजगार निर्मिती आणि विषमता निर्मुलन 

विषय निवडण्या मागची भूमका आणि विषयाची व्याप्ती

 

विचारवेध संमेलन तरुणांचे प्रश्न मांडणारे, त्यांच्या मनातील घालमेल समजून घेणारे आणि या प्रश्नांची उत्तरे शोधणारे विचारपीठ व्हावे असे सर्व विचारवेधींना वाटते. तरुणांपुढील प्रश्न कोणते याचा तरुणांमध्ये जाऊन प्राथमिक मागोवा घेतल्यावर असे लक्षात आले की बेरोजगारी हा भेडसावणारा प्रश्न आहे.. 

 

भारत हा तरुणांचा देश आहे. काम करण्यास उपलब्ध माणसांचे लोकसंख्येमधील प्रमाण हे पुढील वीस वर्षांत भारतात खूप मोठे असणार आहे. या काम करू शकणाऱ्या हातांना आणि मेंदूंना चांगले काम मिळाले की भारताची आर्थिक भरभराट अपरिहार्य आहे. चांगला रोजगार मिळणे हा तरुणाईसमोरचा आजचा ज्वलंत प्रश्न आहे. यांना काम मिळाले नाही तर आपल्यासमोर चालून आलेली ही विकासाची सुवर्णसंधी वाया जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवरचा गंभीर प्रश्न आहे.

 

एका बाजूला शिक्षणाने आर्थिक परिस्थिती सुधारेले असा भास निर्माण केला जात आहे, आणि दुसऱ्या बाजूला तरुणांना पोटासाठी ‘पकोडे तळायचा’ सल्ला दिला जात आहे. पीएचडी झालेली मुले आठ ते नऊ हजारांमध्ये गरज म्हणून मिळेल ते काम करताना दिसतात. इतकेच नाही तर उच्च शिक्षित तरुण सफाई कामगार म्हणून भरती  होण्यासाठी हजारोंनी अर्ज  करीत आहेत.  या सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा वापर सोशल मीडियावर ट्रोल म्हणून करून घेताना राजकीय पक्ष आपल्याला दिसतात. एकूण स्त्रियांमध्ये रोजगार असलेल्या स्त्रियांच्या प्रमाणात गेल्या वीस वर्षांत मोठी घट झाली आहे.  स्त्रियांमध्ये झालेला शिक्षणाचा प्रसार हे या घटत्या प्रमाणाचे एक प्रमुख कारण असल्याचे संगितले जाते! UPSC, MPSC परीक्षांच्या मृगजळामागे धावण्यात आपल्या आयुष्याची मोलाची पाच सहा वर्षे वाया घालवणाऱ्या तरुणांची संख्या फार मोठी आहे. रोजगाराच्या आशेने स्वत:साठी राखीव जागांची मागणी करणाऱ्या आणि इतरांच्या राखीव जागांना विरोध करणाऱ्या मोर्च्यांमध्ये तरुण लाखोंच्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यांच्या समोर कोणतेच  ठोस गुणी नेतृत्व नाही. 

एकीकडे खूप गाजावाजा केलेली ‘मेक इन इंडिया’ ही योजना रोजगार निर्मिती करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेली असताना अस्तित्वात नसलेल्या रोजगारांसाठी तरुणांना ‘सक्षम’ करण्यासाठी ‘स्किल इंडिया’ ही योजना राबवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे.बेरोजगारी आणि विषमता यांचा संबंध दुहेरी आहे.  

 

पहिले म्हणजे आर्थिक विषमता वाढली की मोजक्याच श्रीमंतांकडे मोठा धनसंचय होतो. भारतात अब्जाधीशांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. हे अब्जाधीश त्यांच्याकडे जमा झालेला पैसा उत्पादक भांडवल म्हणून कमी गुंतवतात आणि अनुत्पादक दिखाऊ खर्चात तो वापरतात (उदाहरणार्थ, स्वतः राहण्यासाठी टोलेजंग इमारती बांधणे, स्वतःसाठी विमाने विकत घेणे, इत्यादी). नाहीतर ते हा पैसा परदेशी पाठवतात. तो पैसा काळा की गोरा हा वाद बाजूला ठेवला तरी तो परदेशात गेलेला पैसा भारतात उत्पादन गुंतवणूक म्हणून उपलब्ध होत नाही हे उघड आहे. आणि पैसा परदेशात पाठवणे अगदीच नाही जमले तर हा पैसा भारतातले भांडवलदार भारतातल्या मध्यमवर्गीयांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना लाचार कर्जबाजारी बनवण्याच्या प्रयत्नात खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या मालाला जास्त बाजारपेठ निर्माण होईल असे त्यांना वाटते. बेरोजगार ही कर्जे फेडू शकत नाहीत. मग आर्थिक संकट येते! एकंदरीत आर्थिक विषमता वाढली की बेरोजगारी वाढते. 

 

विषमता आणि बेरोजगारी यांच्यामधील संबंधांना दुसरेही एक अंग आहे आणि ते अधिक गंभीर आहे. बेरोजगारी वाढली की त्याचा खरा फटका हा समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना बसतो. बेरोजगारी वाढली की स्त्रिया रोजगारातून बाहेर फेकल्या जातात. सध्या भारतात हे फार मोठ्या प्रमाणावर घडते आहे. मागास ग्रामीण भागातील छोटे शेतकरी आणि शेतमजूर यांना बेरोजगारीचा मोठा फटका बसतो, आणि ते नाईलाजाने गाव सोडून रोजगार शोधत शहरांकडे येतात आणि तिथेही त्यांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढली की विषमता वाढते आणि विषमता वाढली की बेरोजगारी वाढते असे हे दुष्टचक्र आहे. 

 

आपल्या विचारमंथनातून रोजगार निर्मितीचे आणि विषमता निर्मूलनाचे नेमके कार्यक्रम पुढे यावेत अशी अपेक्षा आहे. मग या कार्यक्रमांचा पाठपुरावा करून विविध राजकीय पक्षांना योग्य भूमिका घेण्यासाठी आपण आवाहन करू शकू. विविध राजकीय पक्षांना ह्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठीची त्यांची ठाम भूमिका मांडण्यास प्रवृत्त करणे हा आपला एक महत्त्वाचा हेतू आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या संदर्भात हे करणे महत्वाचे आहे.  त्यादृष्टीने राजकीय पक्षांना योग्य भूमिका घेण्यास सहाय्य करणे आणि या भूमिका जाणतेपणे तपासून बघण्यास मतदारांना मदत करणे हीही हा विषय आत्ताच निवडण्यामागची महत्त्वाची कारणे आहेत. 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *