स्वयंपाक, मी आणि मम्मी .

स्वयंपाक, मी आणि मम्मी .

स्वयंपाक, मी आणि मम्मी .

आज माझ्या कुटुंबातील सर्व तरुण मंडळी गावाला निघाली होती. अवचित्य होत गावाकडे आजोबांचा वाढदिवस. माझी तब्बेत ठीक नसल्यामुळे मी घरीच होतो, परंतु माझे सगळे चुलत निलत भाऊ बहीण गावाकडे जाणार होते. खास आजोबांना शुभेच्छा द्यायला. अट मात्र एक होती आमच्यात कोणीही मोठा माणूस नको.(उदा.आई,वडील,काका,आत्या वगैरे) .तसे भावाने अगोदरच आजीला व आजोबांना कळवले. परंतु,आज्जी म्हणाली “अरे , बाबांनो तुम्ही सगळे इथं येणार आणि तुमचं खान पिन कोन करनार?”

मग इथे येते माझ्या मम्मीची एन्ट्री. म्हणजे, माझी मम्मी वाढदिवसासाठी नाही तर, तिथे पडणाऱ्या कामाच्या ऱ्हाडगाड्यासाठी चालली होती.मम्मी पण लगेच तयार होऊन निघाली. आता इकडे पुण्यात मी आणि पप्पा घरी होतो. मम्मी नाही म्हणून आम्ही दोघे मिळून घरकाम करू लागलो. आणि इथे झाली स्वयंपाकाची आणि माझी एन्ट्री.

स्वयंपाक करायला मला आवडतो, तस त्यात काय आज नवीन सांगण्यासारखं नाही. परंतु, मी आज स्वयंपाक हा माझ्या मम्मीच्या नजरेतून पाहत होतो.

मी आणि वडील एकमेकांना मदत करत होतो,मजा पण येत होती वडील स्वयंपाक करतात याच कुतूहल आणि रेस्पेक्ट वाटत होता. परंतु मला प्रश्न पडला हाच रेस्पेक्ट हेच कुतूहल मला मम्मी बद्दल का नाही ? वडिलांना मी सगळं हाताखाली देत होतो मग मम्मीच्या वेळेस काय होत ? या प्रश्नांची ढोबळ मानाने उत्तर अशी असतील की “अरे आई रोज रोज करते त्यात कुतूहल नसत. वडील आणि मुलगा कधीतरी करतात मग त्यात तर मजा असणारच ना”. पण मला वाटत याची उत्तर एवढी ढोबळ नाहीयेत. याची उत्तरे दडलीत आपल्या जडणघडणीत. कारण मला हे आज आत्ता का सुजतंय मी फक्त २ तास स्वयंपाक केला ते पण वडिलांची मदत घेऊन तर मला नाकेंनऊ आले. आणि मग मी माझ्या मम्मीच्या नजरेतुन पाहिलं तर मला माझीच लाज वाटू लागली.

समाजव्यवस्था जस स्त्रियांच्या बाबतीत दर्शवते की, स्वयंपाक करण हे किती आनंददायी आणि सृजनशील बाब आहे तस तर मला माझ्या आजच्या अनुभवातून काहीही आकलन झालं नाही. स्वयंपाक करणं हे किचकट आहे तितकंच अवघड ही! पण ही समाजव्यवस्था हा किचकट पणा बायकांसाठी नसतो असे भासवते. कारण हे काम त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि ते त्यांनी करायलाच हवं! (निस्वार्थ भावनेने).

किती एकल आणि पुरुषी व्यवस्था आहे ही याची प्रचिती लगेच आली. जर मी या व्यवस्थेकडे आहे तसेच पाहत राहिलो तर, माझी मम्मी आणि माझ्या आयुष्यात पुढे येणाऱ्या स्त्रियांचं मी असच आयुष्य संसाराच्या नावाने लावू शकतो. आणि इथली पुरुषप्रधानता मला तस खतपाणीही देईल!

खरतर मुळात स्त्रियांची काम उतरंडीमध्ये खालचीच असतात अशी समीकरणे समाजात आहेत म्हणून त्याला दर्जा नाही. आणि वडिलांनी किंवा पुरुषाने काही केलं की त्याला दर्जा ! खरतर मला वाटत घरातली काम करताना एक वेगळा आनंद मिळतो. आपल्या आईची,बहिणींची,प्रेयसीची,बायकोची मन समजतात.त्यांची दुःख समजतात, त्यांच्या छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी समजतात, सुंदर प्रेमाचे क्षण टिपता येतात,त्यांच्या मनाचा गाभा दिसतो.त्यांच्यात घरकामाव्यतिरिक्त अजूनही खूप सुंदर गुण आहेत हे कळत(माझी मम्मी छान गाते).आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला “पुरुषी अहंकार कमी होण्यास खूप मदत होते”.अस माझं प्रांजळ मत आहे. .

असा सगळा विचार करत असताना कार चा हॉर्न वाजला आणि भाऊ आणि मम्मी गावावरून घरी आले. मी आल्या आल्या मम्मीला विचारलं “कसा झाला प्रोग्रॅम”? ती म्हणाली “नेहमीप्रमाणे सगळं आवरून आले”… मम्मी दमली होती रात्रीचे 12 वाजले होते.

तरी, पण मी जडणघडणीप्रमाणे मम्मी आता, आलीच आहे म्हणून तिला पाणी मागितले आणि तिने मला लगेच दिले ही. आणि ती झोपी गेली…

परंतु,शेवटी एक प्रॉमिस नक्की करतो समाजव्यवस्थेचं हे चित्र मी माझ्या वयक्तिक पातळीवर आनंदाने आणि प्रेमाने बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि या पुढेही करत राहील.🥰🌈

–अनिकेत साळवे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *