भूमिका

विचारवेध : उद्देश, भूमिका आणि कार्यपद्धती

विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज बराच काळ रहाणार आहे.  समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचारवेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा 1993 सालापासून आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी, चिकित्सक विचारपद्धती रुजवण्यासाठी,  विचार-वेध पुन्हा सुरु झाले आहे.  

भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे व मुलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्वासमावेषक विकास, समता, बंधुभाव, स्त्रीमुक्ती आणि जाती निर्मूलन यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना विचारवेध व्यासपीठ हक्काने उपलब्ध आहे.

विचारवेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे हे माध्यम आहे. नागरिकांना चिकित्सक विचार करायाला आणि ते व्यक्त करायला प्रोत्साहित करण्यासाठी विचार वेध तर्फे अनेक‘ उपक्रम आयोजित होतात:

  • वार्षिक संमेलने
  • ‘विचार वेचे’ ही चिकित्सक विचाराला चालना देणारी छोटी भाषणे रेकॉर्ड करणे 
  • “विचार वेचे’ भाषणांवर चर्चा आयोजित करणे
  • गावागावातून व्याख्यानमाला भरवणे
  • निबंधमंथना द्वारे वैचारिक लिखाणाला चालना देणे
  • सामाजिक जाणिव आणि व्यक्तिमत्व विकास – तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण    

विचारवेध मधील विषयांमध्ये जास्तीत जास्त वैविध्य असावे, विषय जीवनाच्या, जगण्याच्या प्रश्नांशी निगडीत असावेत असा प्रयत्न असतो. वक्ते त्या त्या विषयातील अभ्यासू, जाणकार लेखक असावेत असाही प्रयत्न असतो. वक्ते सर्व विचारधारा, धर्म, जाती, लिंग, वयोगट आणि प्रदेश यांच्यामधून येतील यासाठी विचारवेध प्रयत्नशील असते.

विचारवेधची कार्यपद्धती ‘लोकशाही’ आणि ‘पारदर्शी’ असते.

विचारवेध मध्ये माहिती आणि  प्रसारण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून विकेंद्रित पद्धतीने सहभाग शक्य करावा असा प्रयत्न असतो.

विचारवेधला राजकीय पक्षांची अवश्यकता आणि सक्रीय राजकारण करण्याची गरज पूर्णत: मान्य आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विचारवेध मधे सहाभागी व्हावे, विचार मांडावेत, ऐकावेत, चर्चा करावी.  पण विचारवेध हा राजकीय सत्तास्पर्धेचा आखाडा होऊ नये यासाठी राजकीय पक्षांचे नेते आणि प्रवक्ते यांनी विचारवेधच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये अशी विचारवेधची भूमिका आहे.

विचारवेध मधे व्यक्त होणारे विचार सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना आणि कार्यकर्त्यांना उपयोगी ठरावेत असा विचारवेधचा उद्देश आहे.

विचारवेध हे निव्वळ चिकित्सक वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ राहील. विचारवेध स्वत: दुसरा कोठलाही रचनात्मक किंवा संघर्षाचा कार्यक्रम राबवणार नाही.

विचारवेध सर्व समविचारी संघटनांशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्यात पुढाकार घेईल आणि त्यांच्या कडून मिळणाऱ्या सहकाराचे स्वागत करेल.