जेष्ठांचे लिव इन

जेष्ठांचे लिव ईन

जेष्ठांचे लिव इन

नोव्हेंबर 2020 मध्ये लोकसत्ता–चतुरंग पुरवणीच्या संपादक आरती कदम यांनी जेष्ठ नागरिकांचं लिव-इन या विषयावर दर पंधरा दिवसाला एक लेख या प्रमाणे वर्षभर सदर लिहाल का? अशी मला विचारणा केली. तेव्हा माझ्या स्वभावाला अनुसरून मी बिनदिक्कत हो म्हणून टाकलं. माझी एक चाणाक्ष मैत्रीण म्हणतेच की, तू आधी निर्णय घेतेस आणि नंतर निर्णयाची उस्तवार करतेस. आहे खरं तसं. पण काय करणार? आदतसे मजबूर..हा विषय एकदा हातात आल्यावर शोध घ्यायला सुरुवात झाली. लिव-इन मध्ये रहाणारे जेष्ठ नागरिक कोण आहेत, ते किती वर्ष एकत्र रहातायत, त्यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय, इतर समाजाची  प्रतिक्रिया काय, लग्न न करता लिव-इन मध्ये रहायचं त्यांनी का ठरवलं, असे प्रश्न मनात आले आणि या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी अशा जोडप्यांचा शोध घ्यायला लागले.

एक सुरवातीलाच स्पष्ट करायला हवं की लिव-इन हा माझ्या अनुभवाचा विषय असला तरी हा काही माझ्या अभ्यासाचा विषय नव्हता.(गेली सात वर्षं मी आणि माझा  मित्र आनंद लिव-इन मध्ये राहत आहोत.) किंबहुना अशा प्रकारचं काम करणाऱ्या संस्थेत माझा सहभागही नव्हता. ते एका परीनं बरंच झालं. कारण त्यामुळं दूरस्थपणं मला अशा जोडप्यांकडे बघता आलं. जाणून घेण्याची असीम जिज्ञासा एवढंच माझ्यापाशी भांडवल होतं आणि त्या जोरावर या विषयात मुशाफिरी करायला मी सुरुवात केली. गेल्या बारा महिन्याच्या काळात एकूण अठरा सत्यकथांच्या सहाय्यानं या विषयाचा अवकाश उलगडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. एक मात्र झालं — या सर्वांशी मनमोकळं बोलताना नवे स्नेहबंध तर जुळलेच; या शिवाय या विषयाचे ताणे-बाणेही माझ्या लक्षात आले. परिणामी लिव-इन हा माझा फक्त वैयक्तिक अनुभव उरला नाही तर या अनुभवाचा विस्तार झाला — भाषा, प्रांत यांच्या सीमासुद्धा या विस्ताराने पार केल्या. (या अठरा कथांचं भविष्यात समाजशास्त्रीय शिस्तीत परिशीलन होऊ शकतं.)

अनुभवांचा हा विस्तार मुळीच सोपा नव्हता. एक तर लिव-इन संबंधीचे अनुभव खाजगीपणाच्या पडद्याआड असतात. `परदेमे रहने दो, परदा ना हटाओ’ अशी या संबंधी बहुतेक जोडप्यांची भूमिका असते. त्यामुळे बरेचदा या कथांच्या नायक-नायिकांना काल्पनिक नावं द्यावी लागली. अगदी परप्रांतातल्या जोडप्यांना सुद्धा काल्पनिक नावांचा आडोसा घ्यावासा वाटला. असं का व्हावं? मला वाटतं लिव-इनला अजून आपल्या समाजाची मान्यता नाही. समाजाची – त्यातूनही जवळच्या नातलगांची – सगळ्यात जास्त म्हणजे स्वतःच्या मुलांची भीड या जोडप्यांना असते. या परिस्थितीला अपवादही आहेत. काही ठिकाणी स्वतः मुलांनी पुढाकार घेऊन जेष्ठांच्या जोड्या जमवल्याची उदाहरणं आहेत. अशी उदाहरणं तुलनेनं कमी आहेत.

हा शोध घेत असताना मला शहरी आणि उच्च जाती-वर्गातलीच उदाहरणं एक अपवाद सोडता मिळाली. ग्रामीण विशेषतः आदिवासी समुदायात जाऊन तिथे जेष्ठ नागरिकांमध्ये लिव-इन आहे का, असलं  तर कसं, याचा शोध मला नक्कीच घ्यायचा होता. पण करोनाकालीन बंधनांमुळे एकूण फिरण्यावर मर्यादा आल्या. मात्र भविष्यात असा शोध घेण्याची माझी इच्छा आहे.

या सर्वांशी बोलताना मला जाणवलं की विवाहसंस्थे विरुद्ध बंड पुकारायचं म्हणून ही जोडपी लिव-इन मध्ये राहत नाहीत. (वोल्गा, दिनानाथ मनोहर हे सन्माननीय अपवाद आहेत..)वैयक्तिक पातळीवर बघता भावनेच्या भरात वाहून न जाता, शांत, स्थिर चित्तानं, संबंधित जोडीनं घेतलेला हा निर्णय असतो. या कहाण्यांकडे सामाजिक पातळीवरून बघता जेष्ठांचं लिव-इन हे अपरिहार्य सामाजिक घटित आहे असं लक्षात येतं. एकीकडे विशेषतः शहरी समाजात रुजलेली विभक्त कुटुंबं काळाच्या ओघात अधिकाधिक आक्रसत चालली आहेत. कौटुंबिक नाती अजून अस्तित्वात असली तरी त्यातलं भौगोलिक आणि भावनिक अंतर वाढत चाललं आहे. तरूण पिढीने प्रगतीची भरारी घेताना देश-भाषा यांची बंधन झुगारून दिली आहेत. मुलं परदेशात किंवा दूरच्या गावात आणि उतार वयाचे पालक आपल्या मूळच्या  घरात हे वास्तव आहे. मूळच्या विभक्त कुटुंबाचे असे तुकडे पडत चालले आहेत. याच्या जोडीला वैद्यकीय  उपचारातल्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आयुर्मर्यादा वाढली आहे. अशा परिस्थितीत काही कारणांनी आपला सहचर गमावला तर मागे राहिलेली व्यक्ती एकाकी होते. एकाकीपणामुळे या व्यक्तीचा जीवनरस सुकत जातो. आपण एकटेच फलाटावर बसलो आहोत आणि सगळ्यांच्या आयुष्याच्या गाड्या धाडधाड आपल्या डोळ्यासमोरून जातायत, पण गाडीतून उतरून आपल्याशी बोलायला कुणाला वेळ नाहीये असं वाटत रहातं. घरात एकट रहाणार्‍यांना घरात घडणार्‍या संभाव्य अपघातांची—उदाहरणार्थ बाथरूममध्ये पडणे, विजेचा शॉक लागणे—सतत भीती वाटत असते. असुरक्षित वाटत असतं. एकाकीपणा त्यांचं मानसिक आणि शारिरीक आरोग्य सतत कुरतडत असतो.

माझ्या निरीक्षणाप्रमाणे पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक चिवटपणे या एकाकीपणाशी सामना करतात. याचं एक कारण म्हणजे कुटुंबात आणि कुटुंबा बाहेरही स्नेह आणि सहकार्यावर आधारलेले काही सामाजिक संबंध त्यांनी आधीपासून जोपासले असतात. पण पुरुषांना येणारा एकाकीपणा अधिक गहिरा असतो. बरेचदा आतापर्यंत त्यांच्या आयुष्यातले संबंध निव्वळ व्यवहार , सत्ता आणि स्पर्धा या निकषावर आधारलेले असतात. त्यामुळे निवृत्ती आणि पत्नीचं मरण त्यांना आत्यंतिक एकाकी करतं. हा फरक असला तरी स्त्रियांना आणि पुरूषांना दोघांनाही मैत्रभावाची, सोबतीची आसोशी असते. अशा परिस्थितीत काही व्यक्तींनी सोबत मिळवली आहे तर काहींना ती मिळाली आहे. अशी सोबत किती जणांना मिळाली आहे याचे ठोकताळे असले तरी निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही.

मी भेटलेले बहुतेक सर्व आपल्या तरूण वयात विवाहसंस्थेच्या मांडवाखालून गेले होते. विशेषतः स्त्रियांनी वैवाहिक संबंधातली घुसमट, पुरुषी वर्चस्व, भावनिक आणि शारीरिक हिंसा सहन केली होती. वैधव्यामुळे किंवा घटस्फोटामुळे एकाकी असलेल्या स्त्रियांना मैत्रभावाची आस होती. आर्थिक स्वावलंबन असलेल्या या स्त्रियांना भावनिक सोबत हवी होती. लैंगिक गरज फक्त पुरूषांना असते असा गैरसमज आहे. कारण वैधव्याची सांगड विरक्तीशी बेमालूमपणे पिढ्यांपिढ्या घालून ठेवली आहे. प्रत्यक्षात लैंगिक गरजेचा अंतःप्रवाह स्त्री पुरुष दोघातही असतो हे लक्षात आले.

पुरुषांच्या बाबतीत मात्र या नात्याकडून असलेली अपेक्षा थोडी निराळी आढळली. स्त्रियांची अपेक्षा मैत्रभावाची तर पुरूषांना त्यांची काळजी घेणारी, खाण-पिण, हव-नको बघणारी, घराला घरपण देणारी स्त्री हवी होती. थोडक्यात स्त्रियांना दुसरा नवरा नको होता तर पुरूषांना दुसरी बायको हवी होती. म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या या नात्याकडूनच्या अपेक्षा गुणात्मक दृष्ट्या निराळ्या होत्या. प्रत्यक्षात ज्या ज्या पुरुषांनी आपल्या पुरुषीपणाला जाणीवपूर्वक लगाम घातला, आपल्या सहचरीला गृहित धरण थांबवलं, स्त्रियांना त्यांच्या कामासाठी, छंदासाठी अवकाश दिला, तिथे तिथे सहजीवन आनंदाचं समाधानाचं झालं आहे असं दिसलं. मिलिंद बेंबळकर यांनी तर प्रांजळपणं सांगितलंच की लग्नामुळे असो नाहीतर लिव-इन मुळे असो, जुळलेलं नातं जोपासणं अधिक महत्वाचं आहे. ही जोपासना करताना पुरुषी अहंकाराचे तण सतत मुळापासून छाटावे लागतात. मूळ पिकाला वाढू न देणारे तण उगवूच नयेत म्हणून शेतीत रासायनिक औषधं असतात. पण मानवी मनाला खुरटं करणारे तण मात्र स्वतःचे स्वतःच उपटावे लागतात. सतत आपुलाच वाद आपणाशी घालावा लागतो.

पुरुषप्रधानतेची मूल्य कळतनकळत स्त्रियांच्या मानसिकतेत उमटली असतात. त्यामुळे लिव-इन साठी जोडीदार शोधताना आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या काही स्त्रियांना आपल्यापेक्षा अधिक सक्षम असलेला पुरुष  हवा असतो. व्यवहाराच्या तराजूत पुरुषाचं पारडं अधिक जड असावं अशी अपेक्षा असते. म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनी स्वतःला तपासून स्त्री-पुरुष संबंधातल्या विषमतेला पोषक ठरणारी मूल्य नष्ट करण आवश्यक आहे. ज्या ज्या जोडप्यांच्या बाबतीत आर्थिक किंवा भावनिक अवलंबित्व नव्हतं, पारदर्शक संवादित्व होतं, तिथे तिथे नातं सुंदर होतं…परस्परांना आधार देणारं आणि अवकाशही देणारं.

हे नातं समृद्ध करण्यासाठी आणखी एक घटक आवश्यक वाटला. तो म्हणजे या नव्या नात्याचा जोडप्याच्या मुलांनी केलेला स्वीकार. आज तरी मुलांना आपल्या पालकांनी अशा नव्या नात्याचा स्वीकार करणे रुचत नाही. या नाराजीला स्वार्थीपणाच ढोबळ लेबल न लावता, सखोल विश्लेषण व्हायला हवं आहे.  या नव्या संबंधामुळे मला वारसा हक्काने मिळणार्‍या संपत्तीत नवा वाटेकरी उदभवेल अशी भीती मुलांना वाटते. दुसरं म्हणजे माझी आई किंवा वडील मला दुरावतील अशी आशंका असते. आपलं कुटुंब हे बहुतेकांच्या मनात अगदी गाभ्याचा, कडेकोट बंदिस्त, असा कोष असतो. त्यात कुणाही त्रयस्थाचा शिरकाव अतिशय अस्वस्थ करू शकतो. शिवाय या प्रश्नाचं मूळ आपण सहजी स्वीकारलेल्या पालकनीतीमध्ये सुद्धा आहे. पालकांच्या, विशेषतः आयांच्या, लेखी मुलं हीच सर्वस्व असतात. स्त्रियांचा तर मुलं हाच ध्यास असतो. या सर्वस्व समर्पणवादी वागण्यामुळे बरेचदा आई मागे दडलेला, कधी दडपलेला, माणूस मुलांना कधी दिसतच नाही. असं होऊ नये म्हणून आयांनी सुरवाती पासूनच आपल्या स्वतःचा स्वतंत्र अवकाश जपणं आवश्यक आहे. आजच्या घडीला आपले पालक माणूस आहेत, त्यांच्या काही मानवी गरजा आहेत याचा स्वीकार मुलांनी करण श्रेयस्कर ठरेल. संपत्ती बाबत बोलायचं तर आई वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलांचा वाटा असतोच. मात्र आईवडिलांच्या  स्वकष्टार्जित संपत्तीची विल्हेवाट कशी करावी हे ठरवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे हे मुलांनी मान्य करणे अगत्याच आहे. या सूत्राचा पालकांनीही स्वीकार करावा. आपली तब्येत नीट असताना, हात न कापता सही करता येत असतानाच सविस्तर इच्छापत्र लिहून ठेवणे हा योग्य मार्ग आहे. शेवट म्हणजे नव्या नात्यापायी मुलांशी असलेले भावबंध तुटण्याची/ तोडण्याची काहीच गरज नाही. सतत संवाद ठेऊन मुलांशी असलेलं नातं लिव-इनमध्ये गेल्यावर अधिक बळकट झाल्याचीही उदाहरणं आहेत.

लिव-इन संबंधात मुख्यतः नेणिवेतून उपजणारा उत्स्फूर्त आक्षेप हा यामुळे कुटुंबसंस्थेला तडा जाईल हा असतो. कुटुंबसंस्था- कौटुंबिक मूल्य यावर हळवं होऊन बोलण्याचा प्रघात जगभर आहे. पण हे हळवं धुकं बाजूला सारून प्रत्यक्षात काय घडतय ते आपण पाहूया. खरोखर जेष्ठांना कुटुंबात सन्मानाची वागणूक मिळते का? त्यांच्या निखळ गरजांची बूज राखली जाते का? मर्ढेकरांकडून उसनवारी करून `आम्हास आम्ही पुन्हा पहावे काढून चस्मा डोळ्यांवरचा’ असं विचारूयात स्वतःला. वास्तव कठोर आहे. यातून काही जेष्ठांनी स्वतःपुरती नवी वाट चोखाळली आहे. प्रश्न असा आहे की हा हमरस्ता होईल का? समतेच्या मूल्यावर आधारलेल, परस्परांना स्नेह देणारं, अवकाश देणारं स्त्री-पुरुष नात्याचं लिव-इन प्रारूप समाजात रूजेल का?

लेखक- सरिता आवाड.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *